Saturday, February 27, 2021

महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान क्षेत्र वीर येथे "श्रीनाथ म्हस्कोबा व जोगेश्वरी माता" यांचा "ऐतिहासिक लग्नसोहळा" पारंपारिक पद्धतीने संपन्न; कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून, मोजक्याच मानकरी, पाटील, पुरोहित यांच्या उपस्थितीत पार पडला लग्न समारंभ...


वीर, दि.२६ : - महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील,  पुरंदर तालुक्यातील  प्रसिद्ध देवस्थान क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा व जोगेश्वरी माता यांचा ऐतिहासिक विवाह सोहळा कोरोना संकटाच्या  पार्श्वभूमीवर  नियमांचे पालन करून, मोजक्याच  मानकरी, पाटील, पुरोहित  यांच्या उपस्थितीत, फटाक्यांच्या आतिषबाजीत, उत्साहात, पारंपारिक पद्धतीने संपन्न झाला.




"महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशी क्षेत्र वीरची ऐतिहासिक यात्रा यावर्षी कोरोना सदृश्य परिस्थितीमुळे, पुणे जिल्हाधिकारी यांच्या संचारबंदीच्या आदेशामुळे रद्द केली असल्यामुळे फक्त ठराविक मानकऱ्यांच्या उपस्थितीत, कोरोनाची नियमावली पाळून, मंदिरामधील सर्व धार्मिक विधी पार पडले." अशी माहिती वीर देवस्थान ट्रस्टचे सचिव तय्यद मुलानी यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.





आज पहाटे ५ वाजता मंदिरात देवाची पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला, सहा वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करून सकाळी देवाला अभिषेक करण्यात आले. यानंतर सकाळी १०.३० वाजता देवाला दहीभाताची पूजा बांधण्यात आली. दुपारी बारा वाजता धुपारती होऊन मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला. यानंतर दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला.





क्षेत्र कोडीतची काठी - पालखी घेऊन ठराविक मानकरी, ग्रामस्थ मंडळी यांचे सायंकाळी सात वाजता क्षेत्र वीर येथे आगमन झाल्यानंतर देवाची धुपारती घेऊन वीर गावचे मुकादम पाटील, ठराविक विश्वस्त व ग्रामस्थ मंडळी, मानकरी, दागिनदार, सालकरी मंडळी यांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानाने भेटा भेट होऊन वाजत गाजत स्वागत करण्यात आले. 





यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवून, योग्य ती काळजी घेऊन व्यवस्थित नियोजन केले. यानंतर मानाची काठी पालखी स्थळावर स्थानापन्न झाली. रात्री ११.३० वाजता समस्त राऊत मंडळींच्या वतीने देवाला पोषाख करून, देवदेवतांना आवाहन करण्यात आले. श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या उत्सवमूर्ती पालखीत ठेवून ढोल ताशाच्या गजरात तसेच कोडीतचीही पालखी बाहेरून अंधारचिंच येथे आल्या.



यावेळी मानकऱ्यांना फुलांच्या माळा घालण्यात आल्या. वाई व कन्हेरी पालख्यांसह मानाच्या काठ्यांची भेटा भेट होऊन सर्व पालख्या देऊळवाड्यात आल्या.





एक मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर चंद्रकांत ज्ञानोबा धुमाळ (मुकादम पाटील) यांच्या हस्ते विधिवत मंत्रोपचार होऊन रात्री 2 वाजून ३५ मिनिटांनी श्रीनाथ म्हस्कोबा  व जोगेश्वरी माता  यांच्या लग्न सोहळ्याला सुरुवात झाली. रात्री २:४५ ला लग्नाच्या सात मंगलाष्टका होऊन, लग्न सोहळा संपन्न झाला. यावेळी पुरोहित संतोष थिटे, दीपक थिटे, नंदकुमार थिटे, किशोर थिटे व श्रीकांत थिटे यांनी पौराहित्य केले. यानंतर सर्व काठ्या - पालख्या पारंपारिक प्रदक्षिणेसाठी गेल्या.






श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टमार्फत कोरोना नियमांचे पालन करून या लग्न सोहळ्यासाठी लाईट, जनरेटर, पालखी मार्ग व्यवस्थापन, विद्युत रोषणाई, परिसर स्वच्छता, आवश्यक कर्मचारी, स्वयंसेवक, ट्राफिक पोलीस इत्यादीचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात दिलीप धुमाळ मित्र परिवारातर्फे आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.





यावेळी श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष धुमाळ, व्हाईस चेअरमन रवींद्र धुमाळ, विश्वस्त हनुमंत धुमाळ, अभिजीत धुमाळ, अमोल धुमाळ, नामदेव जाधव, शिवाजी कदम, संजय कापरे व सचिव तय्यद मुलानी या सर्व मंडळींनी देवस्थान ट्रस्ट तर्फे सर्व व्यवस्था पाहून उत्तम नियोजन केले.





" श्रीनाथ म्हस्कोबा देवाची सन २०२१ सालची यात्रा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे रद्द करण्यात आली आहे. गुरुवार दिनांक २५/०२/२०२१ ते ०९/०३/२०२१ या काळात क्षेत्र वीर येथे शासनाचे कलम 144 लागू करण्यात आले असून भाविकांनी या काळात क्षेत्र वीर येथे येऊ नये." असे आवाहन श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी केले.





" लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवाची यात्रा यावर्षी कोरोना सदृश्य परिस्थितीमुळे रद्द झाल्यामुळे अनेक भाविकांना दुःख झाले पण भाविकांनी आरोग्याची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशाचे सर्वांनी पालन करणे गरजेचे आहे." अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार शिवदास शितोळे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




" महाराष्ट्रातील अठरापगड जाती-जमातींमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवाची यात्रा यावर्षी कोरोना सदृश्य परिस्थितीमुळे, जिल्हाधिकाऱ्यांच्या संचारबंदीच्या आदेशामुळे रद्द झाल्यामुळे लाखो भाविकांच्या काळजाचा ठोका चुकला.  कोरोना महामारीचे संपूर्ण जगावरती संकट असल्यामुळे, महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांनी, भाविकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. क्षेत्र वीर येथे शासनाचे कलम 144 लागू केल्यामुळे भाविकांनी यात्राकाळात वीर येथे येऊ नये तसेच शासनाचे सर्व आदेश पाळावेत." असे आवाहन महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी केले.





कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वच नागरिकांनी व भाविकांनी शासनाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे.



2 comments:

  1. सवाई सर्जाचं चांगभलं... अप्रतिम वार्तांकन
    आपले खुप खुप अभिनंदन संपादक साहेब श्री नाथ महाराज अशेच आपणाकडून दैदित्यामाण व अमूल्य असे काम आपल्या हातून घडो.

    ReplyDelete
  2. सवाई सर्जाचं चांगभलं

    ReplyDelete