Sunday, March 7, 2021

"भक्तांचे आयुष्य सर्वांगाने समृद्ध करणारी; आमच्या श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांची भक्ती" - महाराष्ट्र पोलीस खात्यातील 'कर्तबगार शिलेदार, इतिहास अभ्यासक सरदार बापूसाहेब धुमाळ' यांचा रविवार विशेष लेख...



" श्रीनाथ म्हस्कोबा जोगेश्वरी प्रसन्न "

" भक्तांचे आयुष्य सर्वांगाने समृद्ध करणारी; आमच्या श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांची भक्ती"




महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या, श्रीनाथ म्हस्कोबा महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी वीर येथे 1976 ला माझा जन्म झाला. जन्मापासूनच माझ्या आयुष्याचा संघर्ष चालू होता एकवीस दिवस कोमात झटके येत होते. जगतो की मरतो  शाश्वती नव्हती पण श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या आशीर्वादाने तेव्हा मी वाचलो आणि आज पर्यंत श्रीनाथांच्या आशीर्वादाने आयुष्याची भरभराट चालू आहे. 




माझे बालपण वीर गावच्या धुमाळवाडीच्या छोट्याशा वस्तीत अस्सल  रांगड्या मातीत, श्रीनाथ महाराजांच्या पंढरीत  आनंदात गेले. इयत्ता चौथी ते दहावी शिक्षण माझ्या आजोळी मालगाव, सातारा येथे घेतले. अकरावी बारावी लोणंदला महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना धुमाळवाडी ते वाठार कॉलनी  सायकल वरून प्रवास करत असे.




मी कॉलेजला असताना वडिलांची श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांवरची श्रद्धा व भक्ती पाहून मला श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांची सेवा करायची प्रेरणा मिळाली. श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या भक्तीचे मनाला लागणारे वेड काही वेगळेच आणि  आनंददायी असते. सन 1992 पासून सलग 151 निरंकार, पाणी न पिता मी धरलेले रविवारचे उपवास यामुळे श्रीनाथ महाराजांशी आमचे भक्तीचे नाते अधिकच घट्ट झाले.




प्रत्येक रविवारी घोडेउड्डान ते वीर हा प्रवास आमचे भाऊ  हनुमंत आनंदराव धुमाळ व वीर येथील बंधू विशाल नानासो धुमाळ  उर्फ पिंटू पाटील यांच्यासोबत करून वीर मधील साडेनऊची धुपआरती व देवाच्या छबिन्याचा कार्यक्रम आटपून मी पायी धुमाळवाडीला येऊन रविवारचा उपवास सोडत असे.




आमची परिस्थिती जरी बेताची असली तरी त्यावेळी क्रिकेटची विशेष आवड होती मला, त्यामुळे दिवस-दिवस क्रिकेटचे सामने खेळून एक बॅट घेतली होती ती आजही माझ्याकडे आहे त्यावर श्रीनाथ लिहिलेला आहे. श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचे भक्तीभावाने धरलेले 151 उपवास पूर्ण झाल्यानंतर सन 1997, 15 डिसेंबरला बापू जमदाडे यांच्यासह एम्प्लॉयमेंट कार्ड काढायला पुण्याला गेलो.




हडपसरला माझ्या आत्याचे घर असल्यामुळे 15 डिसेंबर ते 28 डिसेंबर हडपसर ते शिवाजीनगर पायी चालत जाणे व माघारी येणे आणि 31 डिसेंबरला मी पोलीस खात्यात भरती झालो व त्यानंतर ट्रेनिंग साठी मुंबईला गेलो. 




श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांची भक्ति प्रामाणिकपणे करेल त्याला नाथ महाराज काहीच कमी पडू देत नाहीत. याचा अनुभव मला माझ्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर येत राहिला.




पोलिस ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतरही मी  देवाची सेवा नित्यनियमाने असेल तेथून करत राहिलो. आज सत्तावीस वर्षे पूर्ण झाली तरी देवाची सेवा व आशिर्वाद विसरलो नाही.पहिला पगार देवाचे चरणी घोडेउड्डाण येथे घंटा वाहिली ती आज पण वाजत आहे, घोडेउड्डान येथे देवाचा जीर्णोद्धार करायची संधी मला मिळाली त्यावेळी मी स्वतः व मित्र परिवारा कडून पैसे जमा करून दीड लाख रुपये किमतीचे चांदीची महिरप असो की सोन्याचा कळस किंवा पूर्ण जीर्णोद्धार सर्व कामे प्रामाणिक पणे पार पाडली. देवाने सर्व कामे पूर्ण करून घेतली.




पोलिसाची नोकरी सांभाळून आज पर्यंत न चुकता वीर येथील देवाच्या प्रत्येक कार्यक्रमास मी आवर्जून उपस्थित राहतो. वीर देवस्थानचे रामभाऊ धुमाळ, सुभाष आबा धुमाळ, धैर्यशील धुमाळ, पीजी धुमाळ, तानाजी धुमाळ, माऊली वचकल, राजन धुमाळ, डॉ. सुनील धुमाळ, सरदार ग्रुप व श्रीनाथ म्हस्कोबा ग्रुप, वीर ग्रामस्थ, गुरव, पुजारी, घडशी, गोसावी, मानकरी, दागिनदार यांनी सर्वांनी व विर देवस्थान ट्रस्टने जी जबाबदारी दिली मला, मग ती यात्रा नियोजन असो, मंदिरातील सर्व कार्यक्रम असो, नाथ भक्त म्हणून देवाने दिलेली सर्व जबाबदारी मी प्रामाणिकपणे व मनापासून पार पाडली.




देवाने आमचा सरदार ग्रुप, ग्रामस्थ, देवस्थान ट्रस्ट, मित्रपरिवार यांच्याकडून विविध कामे करून घेण्याची बुद्धी दिली. सन 2012 पासून माझ्या मनात विचार आला की आपल्या देवाचा इतिहास तोंडी आहे, चरित्र स्वरूपात आहे पण याला काही तरी अजुन पुरावे पाहिजेत म्हणून 2012 पासून आज पर्यंत देवाच्या इतिहास संशोधनाचे कार्य मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करत आहे. 




तसेच काही पहिलवान मित्र म्हणायचे एवढी मोठी यात्रा पण कुस्ती आखाडा मोठा भरत नाही ती हुरहूर मनाला लागली आणि देवस्थानच्या मार्गदर्शनात निमगाव इंदापूर येथे आखाडा कसा बांधला आहे ते पाहायला गेलो त्यापेक्षा ही सुंदर आणि मोठा आखाडा वीरला बनवायचा म्हणून आमच्या देवस्थान व सरदार ग्रुप ग्रामस्थ वीर यांनी मिळून 2014 -15 ला आखाडा  बांधून घेतला 80 फूट व्यासाचा आखाडा तयार झाला. 




चालीरीती, मानपान कसे आले, कोणी आणले. देवाचे सुरुवातीचे ठिकाण काशी, सोनारी, ते विर, कोडीत देवाचा प्रवास व सातगावच्या पालख्या तसेच वीर गावचा इतिहास शोधण्याची जबाबदारी देवाने माझ्यावर दिली असावी असे मला मनापासून वाटते ती पूर्णत्वाकडे जात आहे.





सन 626, 1236, चालुक्यकालीन, शिवकालीन, मोगलकालीन, ब्रिटिशकालीन, इतिहासाचा शोध घेऊन देवावरची ऐतिहासिक पुस्तिका बनवण्याचा मानस आहे. मला माझ्या आयुष्यात देवाचे खुप अनुभव आलेले आहेत. सर्व तन-मन-धन लावून देवाची प्रामाणिक सेवा केल्यास देव नक्की तुमच्या पाठीशी उभा राहतो असा अनुभव बऱ्याच वेळा आलेला आहे.




देवावरचे ऐतिहासिक पुस्तक पूर्ण करण्यासाठी सर्व ग्रामस्थ, देवस्थान ट्रस्ट, वरील उल्लेख  केलेला सर्व मित्रपरिवार, माझी आई वडील,कुटुंबातील सदस्य, पत्नी (मोनाली -- सर्व लिखाण टायपिंग करणे पासून सर्व मदत करत आहे)तसेच इतिहास अभ्यासक, महत्वाचे सहकार्य सहकारी  बंधू जगदिश धुमाळ व मार्गदर्शक  व पत्रकार मित्र सहकार्य करत आहेत.





आज आमचेकडे वीर गावचा संपूर्ण इतिहास उपलब्ध आहे. यासाठी परिंचे येथील राम वाघोले, गुणशेखर बापू जाधव, वाल्हे येथील समस्त वाल्हेकर परिवार, माहूर, पांगारे, सासवड, सातारा गादी पासून अनेक ठिकाणचा, अनेकांकडून पूर्ण इतिहास समजून घ्यावा लागला. जेजुरी, वीर देवस्थानचा सखोल अभ्यास करावा लागला.




कऱ्हा नदीचा उगम, पूर्ण गंगा नदीचा उगम याचाही शोध लागला. पुरातन महाभारत, रामायण, जयाद्री महात्म्य, वीर मधील उपलब्ध माहिती, यात्रा कशी भरते? देव कसे वीरला आले? वीर व  घोडेउड्डाण येथील सर्व मंदिरांची रचना कशी आहे? त्या त्या काळातील खाणाखुणा, उपलब्ध वीरगळी, दरवाजावरील गणपती या सर्वांची, उपलब्ध माहितीनुसार माहिती घेत आहे. 





सर्वसमावेशक प्रत्येक गावची माहिती मिळवली. अजित जानकर, सोनारीचे पुजारी, म्हसवड, खरसुंडी, शिखर शिंगणापूर, बोरबन, तसेच वीर गावातील नारळ दुकानदार यांनी सर्वांनी मदत केली. तरी अजून कोणाकडे वीर गावाबाबत तसेच श्रीनाथ म्हस्कोबा देवा बाबत लिखित व ऐकीव माहिती असल्यास आम्हाला कळवावे व संपर्क करावा. वरील सर्व काम वीर देवस्थान ट्रस्ट यांच्या परवानगीने व मार्गदर्शनाखाली चालू आहे.




" असे श्रद्धा ज्याचे ऊरी त्यासी दिसे श्रीनाथ जोगेश्वरी"

हे खरे आहे. एवढेच सांगेन.

लेखक : - महाराष्ट्र पोलीस खात्यात उत्कृष्ट कामगिरी करणारे शिलेदार, इतिहास अभ्यासक, श्रीनाथ भक्त सरदार बापूसाहेब धोंडीबा धुमाळ




6 comments:

  1. सवाई सर्जाचं चांगभलं

    ReplyDelete
  2. चांगभलं !!! पुस्तक लेखनासाठी काही मदत लागल्यास संकोच संपर्क करा - अजय समगीर

    ReplyDelete
  3. सवाई सर्जाचं चांगभलं। श्रीनाथ म्हास्कोबा प्रसन्न।

    ReplyDelete
  4. श्रीनाथ म्हस्कोबाच्या पुस्तक छापाई साठी आआर्थिक मदत करण्याची इच्छा आहे. संपर्क क्र. 9011613313.

    ReplyDelete